बायकोला फोन करत निरा-देवघर धरणाच्या पाण्यात तरुणाची आत्महत्या
भोर : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात नीरा-देवघर धरणाच्या पाण्यात पुण्यातील धनकवडी येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीकांत जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून रविवारी(दि.१५ सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह नीरा देवघर पाण्याबाहेर काढला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांना ११२ क्रमांकावर कॉल आला की एक व्यक्तीने वरंधा घाटातील वारवंड गावच्या जवळ आत्महत्या केली आहे. पोलिसांनी माहिती घेतली असता संबंधीत व्यक्तीचे नाव श्रीकांत जाधव असल्याचे निदर्शनास आले. श्रीकांत हा रविवारी त्याची कार(एम.एच. १२ आर.वाय. ४२८६) घेवून वरंधा घाटातील वारवंड येथे आला. घाटात आल्यावर त्याने पत्नीला फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत भोरचे नायब तहसीलदार आदिनाथ गाजरे, मंडलाधिकारी रूपाली गायकवाड, वारवंडचे पोलीस पाटील सुधीर दिघे आणि भोरमधील भोईराज जलआपत्ती व्यवस्थापन केंद्राचे कार्यकर्ते होते.
त्यांना वरंधा घाटातील वारवंड गावच्या हद्दीत रस्त्याच्या क़डेला कार उभी दिसली परंतु त्यामध्ये कोणीही नव्हते. त्यांनी त्यापुढे पाच-सहा किलोमीटर अंतराचा परिसर पिंजून काढला. अखेर दोन तासांनी त्यांना नवलाई पूल परिसरात निरा-देवघर धरणाच्या पाण्यातून श्रीकांत जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला. सदर घटनेबाबतचा अधिक तपास भोर पोलीस करीत आहेत.