खेड शिवापूर येथे अज्ञात चोरट्यांकडून बँक लुटण्याचा प्रयत्न
खेड शिवापूर : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीरामनगर बांडेवाडी(ता. हवेली) गावच्या हद्दीतील पुणे मर्चंट को. ऑप. बँक लि. पुणे, खेडशिवापुर शाखेत चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत बँकेचे मॅनेजर सत्यजित संपतराव जाधव(वय ४६ वर्ष) यांनी राजगड पोलीस ठाण्यात शनिवारी(दि. ९ सप्टेंबर) फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामनगर बांडेवाडी(ता. हवेली) येथे पुणे मर्चंट को. ऑप. बँक लि. पुणे बँकेची शाखा आहे. शनिवार(दि. ७ सप्टेंबर) आणि रविवारी(दि. ८ सप्टेंबर) बँकेला सुट्टी असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या बाहेरील लोखंडी पत्र्याचे शटर व लोखंडी ग्रील वाकवुन त्यावाटे आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांच्या हाती काहीही लागलेले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी बँकेचे शटर उघडे दिसल्याने ही चोरीची घटना उघडकीस आली. तसेच बँकेच्या बाहेरील लोखंडी पत्र्याचे शटर व लोखंडी ग्रील वाकवुन नुकसाण केल्याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील सदर घटनेचा पुढील तपास करीत आहेत.