कोंढणपूर-शिवापूर रस्त्यावर पीएमपी बसची गाईंच्या कळपाला धडक; संतप्त ग्रामस्थांकडून ‘रास्ता रोको’, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
खेड शिवापूर : कोंढणपूर-शिवापूर (ता. हवेली) रस्त्यावर भरधाव पीएमपीने चरायला निघालेल्या गाईंच्या कळपास धडक दिली. यातील तीन गाईंचा मृत्यू झाला असून अनेक गाई गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघाताबाबत अजय तुकाराम मुजुमले (वय ३५ वर्ष, रा. कोंढणपूर,ता. हवेली) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून पीएमपी चालक अशोक पांडुरंग पवार (वय ३८ वर्ष सध्या रा. कात्रज, मूळ रा. नांदेड) यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १० जानेवारी) सकाळी पावणेसातच्या सुमारास गोठ्यातून शेताकडे चरावयास निघालेल्या ३५ गाईंच्या कळपापैकी पुढे चाललेल्या १४ गाईंना कोंढणपुरहुन पुण्याकडे जाणाऱ्या अवसरवाडी-कात्रज या भरधाव पीएमपी बसने धडक मारली. कळपातील तीन गाईंचा जागीच मृत्यू झाला तर इतर गाई गंभीर जखमी झाल्या आहेत.
कोंढणपूर येथील अजय तुकाराम मुजुमले यांचा देशी व सेहवाल, गीर गाईंचा गोठा असून सर्व गाई रोज सकाळी गोठ्या शेजारील डोंगरामध्ये चरण्यासाठी जातात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गाई गोठ्यातून डोंगराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी कोंढणपूरकडून येणारी भरधाव पीएमपीने प्रथम एक गाईला ठोकर मारुन पुढे गेली. बस वेगात असल्यामुळे गाईंच्या कळपात घुसली. त्यातील तीन गाईंचा जागीच मृत्यू झाला तर बाकीच्या गाई गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी बसला थांबवले व पोलिसांना याबाबत तातडीने माहिती दिली. यावेळी राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक पोलिस निरीक्षक राठोड व हवालदार प्रमिला निकम आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते
“जखमी झाल्याने गोठ्याचे मालक शेतकरी अजय मुजुमले यांचे १४ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष धडक बसलेल्या १४ गाईंपैकी तीन मृत व इतर गाई गंभीर जखमी असून त्यामधील एक ते दोन गाई वाचण्याची शक्यता आहे.”
– संदेश गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी
दरम्यान या अपघातात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दुपारपर्यंत कोणत्याही प्रशासनाने दखल न घेतल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांच्यासह गाईंचे मालक अजय मुजुमले त्यांच त्यांचे वडील तुकाराम मुजुमले व कोंढणपूर परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळीच रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनानंतर मात्र पीएमपीएल प्रशासनाने दखल घेत व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी फोनवर आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार योग्य ती भरपाई सात दिवसांत देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.