जांभळवाडी कोर्ले येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार, गेल्या पंधरा दिवसातील तिसरी घटना; बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
भोर : भोर तालुक्यातील जांभळवाडी कोर्ले येथे गोठ्यात शिरून वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात वासराचा मृत्यू झाला आहे. जांभळवाडी कोर्ले येथे शेतकरी बाजीराव राजाराम वाडकर यांचा घराच्या वरच्या बाजूला गुरांचा गोठा आहे. गोठ्यात चार बैल, तीन गाई व वासरू बांधलेले होते. त्यातील वासरावर बुधवारी बिबट्याने हल्ला केला. गुरुवारी (ता. ९) सकाळी वाडकर गोठ्यात गेल्यावर ही घटना समजल्यावर त्यांनी वनविभागाला कळवले. या घटनेपूर्वीही मागील पंधरा दिवसांत बिबट्याने याच गोठ्या शेजारून एका कुत्र्याला पळवले होते, तर नारायण भैरू चिकणे यांची चरायला सोडलेली शेळी पळवून नेली होती.
बिबट्या गोठ्यात शिरल्याने गावात व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरे चरायला व पाण्यावर नेण्यासाठी शेतकरी भीत आहेत. वारंवार बिबट्याच्या हल्याच्या घटना घडत असून, रात्रीचे वेळी नागरिक बाहेर पडण्यास तसेच रानात जाण्यास घाबरत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी. तसेच या भागातील सध्या जत्रा सुरू होणार आहेत. लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तरी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ बबन चिकणे यांनी केली.