नाशिक येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला नाझरेचा युवराज खोपडे
भोर : नाशिक येथील ग्रिकोरोमन वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नाझरे(ता. भोर) येथील युवराज मोहन खोपडे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत ९७ किलो वजन गटाचे सुवर्णपदक पटकाविताना धुळेच्या गौरव ठाकरेवर मात करीत विजेतेपद पटकाविले. युवराज हा भोर तालुका तालीम संघांचे अध्यक्ष वस्ताद मोहन नाना खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. कुस्ती स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल युवराजवर भोर तालुक्यातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
भगूर येथे बलकवडे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात आयोजित महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या सहकायनि वरिष्ठ ग्रीको-रोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे आयोजन नाशिक जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष विशाल बलकवडे यांनी केले होते. स्पर्धेत राज्यभरातील सुमारे २४० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यावेळी पंच म्हणून दिनेश गुंड, गणेश कचरे, नितीन शिंदे, सोनू काबुले, संजय गायकवाड आदींनी काम पाहिले. विजयी झालेले खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून या स्पर्धेचे ठिकाण आणि तारीख काही दिवसांनी जाहीर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.