भोरच्या तलाठी श्रद्धा खैरेंची एमपीएससीत भरारी; राजपत्रित अधिकारीपदी निवड
भोर : भोर तालुक्या मधील वीसगाव खोऱ्यातील खानापूर नेरे सज्यात सध्या महिला आदर्श तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या श्रद्धा खैरे-चौधरी (मूळ गाव पाबळ, ता. शिरूर) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी प्रवर्गात मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी या राजपत्रित अधिकारीपदी निवड झाली.
श्रद्धा यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, खैरेनगर, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, धामारी येथे तर बारावीपर्यंतचे शिक्षण बारामती येथे शारदाबाई पवार विद्यालय व पाबळ येथे पूर्ण झाले. अवसरी येथील शासकीय महाविद्यालयात त्यांनी ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग पदवी घेतली आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात तलाठी या पदावर त्यांची निवड झाली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाबद्दल त्यांचे भोर तालुक्याच्या विविध स्तरांतून कौतुक होत आहे. या यशात वडील माजी सरपंच एकनाथ खैरे व आई संगीता तसेच पती वैभव चौधरी व सासू-सासरे यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. तर, भोर प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार अरुण कदम यांचे सहकार्य लाभले. तसेच उपजिल्हाधिकारी व सध्याच्या शिरूर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.