बालविवाह लावून देत असताल तर सावधान !
वर्हाडाची वरात उंब्रज पोलीस ठाण्यात
सातारा : उंब्रज परिसरातील एका गावात सुरू असलेला अल्पवयीन मुलामुलीचा विवाह कराडचे निर्भया पोलीस पथक आणि उंब्रज पोलिसांनी रोखला. याप्रकरणी मुलीचे आई-वडील व मुलाची आई यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई करताना पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील वर्हाडी मंडळींना पोलीस ठाण्यात आणले.
याबाबत माहिती अशी की, उंब्रज परिसरातील एका गावात जिल्हा परिषद शाळेच्या मागे अल्पवयीन मुलामुलीचा विवाह होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती कराडच्या निर्भया पोलीस पथकाला दिली. निर्भया पथकातील पोलीस नाईक दीपा पाटील, साबळे, फल्ले, उंब्रज पोलीस ठाण्याचे हवालदार सोरटे, माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तेथे पोहोचले, तेव्हा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. पोलिसांची चाहूल लागताच, अल्पवयीन मुलगा, मुलगी, मुलीचे आई-वडील आणि मुलाची आई यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद दीपा पाटील यांनी दिली असून, हवालदार सोरटे तपास करत आहेत.