बदली शिक्षक ठेवणे पडले महागात! महिला शिक्षक निलंबित; भोर नगरपालिकेच्या शाळेतील प्रकार
मुख्य संपादक : दिपक महांगरे
भोर : भोर नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी स्वत: ऐवजी दुसरी महिला (बदली शिक्षक) ठेवणे महिला शिक्षिकेला चांगलेच महागात पडले आहे. भारती दीपक मोरे असे या शिक्षिकेचे नाव असून सदर महिलेने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे व भोर नगरपालिका प्रशासन अधिकारी राजकुमार बामणे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
सदर प्रकरणाची महिती मिळाल्यावर मुख्याधिकारी गजानन शिंदे अचानक शाळेला भेट दिली असता, ही घटना उघडकीस आली. मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित महिला शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले की, नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळेवर मोरे या गैरहजर असून, तिच्या जागेवर दुसरीच महिला विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. २१ मार्च) दुपारी दोनच्या सुमारास शाळेस भेट दिली. त्यावेळी संबंधित शिक्षिका ही गैरहजर होती आणि तिच्या जागेवर दुसरीच महिला विद्यार्थ्यांना शिक्षण देताना आढळून आली. शिकवत असलेल्या बदली महिलेला संबंधित शिक्षिका पगार देत असल्याचेही निदर्शनास आले.
त्यामुळे संबंधित शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शहरात नगरपालिकेच्या तीन शाळा असून, विद्यार्थी संख्या २७१ आहे. त्यासाठी ११ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, अशा प्रकारे शिक्षक जर शासनाची फसवणूक करीत असतील आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम करत असतील तर अशा शिक्षकांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
भारती दीपक मोरे (उपशिक्षिका, महाराणा प्रताप नगर परिषद शाळा क्र.१) यांना दि. २६ मार्च पासून नगर परिषद सेवेतून तात्पुरते निलंबित करण्यात आले असून निलंबन कालावधीत त्यांना मुख्यालय भोर नगर परिषद भोर हे राहील. भारती दीपक मोरे यांना परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले.