भुईंज पोलिसांची चमकदार कामगिरी… कौशल्यपूर्ण तपासा मुळे चोरांना परराज्यातून अटक…
सातारा न्यूज : भुईंज(जि.सातारा) पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी तपास करत चक्क मध्यप्रदेश मधून तब्बल १८ लाख रुपये हस्तगत करत आरोपींना ताब्यात घेतले. नरेंद्र प्रल्हादसिंग ग्रासे हे पुण्यातील व्यापारी कंपनीच्या मशनरी विक्रीतून बॅगमध्ये असलेले २२ लाख रुपये घेऊन प्रवास करत असताना २६ सप्टेंबर रोजी नाश्ट्टयासाठी सकाळी साडेसात ते आठ च्या सुमारास बस वाई तालुक्यातील गोपेगाव हद्दीतील हॉटेल कोहिनूर येथे थांबली असता त्यांच्यावर लक्ष ठेऊन असणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी बॅग चोरून पोबारा केला. तसा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. ही गंभीर घटना असल्याने पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपास सुरू केला. सातारा गुन्हे शाखेची व पोलिसांची पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळा पासून सातारा – पुणे रोडवरील १०० पेक्षा जास्त सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून आरोपी निष्पन्न केले. सदरील आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील धरमपुरी(जि.धार) येथील असल्याचे समजताच पोलिसांच्या तपास पथकाने कसून तपास करीत ८ ऑक्टोबर रोजी गुन्हातील आरोपी रज्जब हसन खान (वय ४१ वर्षे ) यास धरमपुरी जि.धार,मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आणि कसून तपास करत चोरी झालेल्या रकमेपैकी १८ लाख रुपये हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार शरद बेबले,प्रवीण फडतरे,अविनाश चव्हाण,गणेश कापरे,रोहित निकम,विशाल पवार,सचिन ससाणे, नितीन जाधव,रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ,सागर मोहिते,किरण निंबाळकर यांनी केली.