बोपदेव घाट अत्याचार प्रकरण : पोलिसांनी 450 गुन्हेगार तपासले, 40 गावे पालथी घातली; 60 तपास पथकाकडून शोधकार्य सुरु
सासवड : बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (दि.३ ऑक्टोबर) रात्री मित्रासह फिरायला गेलेल्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यासाठी पोलिसांनी ६० तपास पथके तयार केली आहेत.
तसेच गेल्या पंधरा दिवसांमध्ये बोपदेव घाटमार्गे गेलेल्या सुमारे ५० हजार मोबाईल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. याशिवाय यापूर्वी शहरातील प्रमुख टेकड्या, घाट परिसरात विनयभंग, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली आहे.
घटनास्थळापासून जवळ असलेल्या सुमारे ४० छोट्या-मोठ्या गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली आहे. त्या गावांतील ढाबे, दारू विक्रेते, लपूनछपून अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे.
पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यामध्ये पूर्ण रस्त्यावरील परिसर दिसत नसल्याने अडचणी येत आहेत. यासाठी सासवड, राजगड पोलिसांची देखील मदत घेण्यात येत असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.