नवले पुलाजवळ वाढत्या अपघातांमुळे लवकरच एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली(ITMS) लागू होणार…पुणे प्रादेशिक परिवहन(आरटीओ)अधिकारी संजीव भोर यांची माहिती…
संपादक: दिपक महांगरे
पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील नवले ब्रिज स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी पीठ वाहून नेणाऱ्या ट्रकची आणी दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुली सह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला.जिथे सोमवारी रात्री चार जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचे गांभीर्य पाहता पुणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकारी संजीव भोर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंगळवारी रात्री नवले पुलाजवळील अपघातस्थळी भेट दिली. संजीव भोर म्हणाले की आम्ही गेल्या तीन वर्षांपासून इतर प्रशासकीय यंत्रणांसोबत या मार्गावर रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना राबवत आहोत. कालचा अपघात दुर्दैवी होता, परंतु अपघाताचे कारण शोधण्यासाठी आमच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे.आमचा अहवाल त्यांना सादर केला जाईल.अपघातांना आळा घालण्यासाठी या नवले पुलाजवळील महामार्गावर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ITMS) लागू करण्याची आरटीओची योजना आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने ऑगस्ट 2023 मध्ये सर्व नऊ प्रमुख महामार्गांवर ITMS यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ITMS प्रकल्प नुकताच पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. ITMSप्रणालीम्हणजे नक्की काय? आयटीएमएस म्हणजे महामार्गावर किंवा रस्त्यांवर एचडी कॅमेरा बसवणे होय. हे कॅमेरे ३०० मीटर अंतरावर बसवलेले असतात. यामुळे महामार्गावरील कोणत्याही भांगातून चालकांच्या हालचाली वर लक्ष ठेवता येते. ही यंत्रणा काम कशी करते? यामध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर (ANPR) द्वारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक करावाई केली जाते. ४० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास त्याला दंड केला जातो. या यंत्रणेत कॅमेऱ्यांद्वारे वाहनांची नंबर प्लेट पाहून चालकाने मोडलेला नियम रेकॉर्ड केला जातो. ज्या दिवशी नियम मोडला, त्यादिवशी तारीख आणि वेळ असलेला फोटो थेट नियंत्रण कक्षाला पाठवला जातो आणि तिथून चालकाच्या पत्त्यावर दंडासाठी ऑनलाईन कारवाई केली जाते. या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आयटीएमएस ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.