वॉटरपार्कला चाललाय सावधान! राजगड वॉटर पार्कमध्ये ३० फूट उंचीवरून कोसळून २८ वर्षीय तरुणीचा दुदैवी मृत्यू
मुख्य संपादक : दिपक महांगरे
नसरापूर : सध्या उन्हाळा सुरू आहे. अनेक ठिकाणी वॉटर पार्कमध्ये गर्दी होऊ लागली आहे. वॉटर पार्कमध्ये पाण्यात खेळणं, झिपलाइनिंग, मोठमोठ्या राईड्समध्ये बसून त्याचा आनंद घेतला जातो. मात्र हाच आनंद एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. पुणे-सातारा महामार्गावरील राजगड वॉटर पार्क रिसॉर्टमध्ये शुक्रवारी (दि. १८ एप्रिल) तब्बल ३० फूट उंचीवरून कोसळून एका २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तरल अरूण आटपाळकर असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत नंदकिशोर श्रीपती आटपाळकर (वय ५० वर्ष, दोघेही रा. सेलेशिया पार्क, नऱ्हे(धायरी), पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकं काय घडलं?
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय तरल आटपाळकर ही तरुणी आपल्या कुटुंबियांसोबत शुक्रवारी सकाळी पुणे-सातारा महामार्गावरील वरवे खुर्द (ता. भोर) गावच्या हद्दीतील राजगड वॉटर पार्क रिसॉर्ट येथे फिरण्यासाठी गेली होती. दुपारच्या सुमारास ते रिसॉर्ट मध्ये पोहोचले. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास तरल ही झिपलाइनिंग करण्यासाठी गेली. झिपलाइनिंग म्हणजे काय? तर एका विशिष्ट उंचीवर ज्यात दोऱ्याच्या साहाय्याने एका उंचीवरून दुसऱ्या उंचीवर सरकत स्लाइड करत जाणे असते.
झिपलाइन रोप वरून चालत जात असताना सुरक्षा दोर ही वरच्या रेलींगला लावण्यासाठी पुरत नसल्याने तरल ही लोखंडी स्टुलवर उभी राहीली. परंतु सदरचा स्टुल हालल्याने तिचा तोल जावुन ती साइडच्या रेलींगवर पडली. तेथून ती तब्बल ३० फुट खाली जमीनीवर कोसळली. यानंतर तरुणीला उपचारासाठी नसरापूर(ता. भोर) येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे आणण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
राजगड वॉटर पार्कवर निष्काळजीपणाचे आरोप..
ही दुर्घटना घडल्यानंतर राजगड वॉटर पार्कमध्ये लोकांच्या आयुष्याशी खेळ खेळला जातोय का? या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या घटकांची माहिती तरुणीला का देण्यात आली नाही? सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित जागेवर उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? या निमित्ताने राजगड वॉटर पार्कमधील सुरक्षा व्यवस्था आणि निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजगड वॉटरपार्क मालकावर व चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या घटनेबाबतचा अधिक तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.