भोर विधानसभा मतदारसंघातील रिक्त शिक्षकांच्या जागा ताबडतोब भराव्यात अन्यथा आंदोलन करणार : आमदार संग्राम थोपटे
भोर : जिल्हा परिषद प्रशासनाचा वेळ काढूपणा व नियोजनशून्य कारभारामुळे भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त होती परंतु तीच परिस्थिती सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राहणार असल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १५ जूनपासून शिक्षकांवर ताण येणार असल्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार असून विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांची नेमणूक भोर तालुक्यात करावी, अशी मागणी शिक्षक संघटनेने देखील केली आहे.
तालुक्यातील या गंभीर प्रश्नावर आमदार संग्राम थोपटेंनी देखील भाष्य केले आहे. ते बोलले की, भोर विधानसभेतील शिक्षकांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तालुक्यातून बदली झालेला शिक्षक तो अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कार्यमुक्त केला जातो. परंतु त्या जागेवर नव्याने शिक्षक येईपर्यंत बदली झालेल्या शिक्षकाला कसे काय पदमुक्त केले जाते? असा प्रश्न आहे. आज दि. १५ जूनला शाळा सुरु होत असताना माझ्या मतदारसंघातील रिक्त शिक्षकांच्या जागा ताबडतोब भराव्यात अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर आंदोलन करून जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.