शूर वीरांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे – राजेश पांडे
नसरापूर : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, समाजसुधारकांनी तसेच अनेक ज्ञात-अज्ञात देशवासियांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्व शूर वीरांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन मेरी माटी मेरा देश प्रदेश संयोजक तथा भाजप चे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी केले.
नवसह्याद्री शिक्षण संस्था नसरापूर येथे गुरुवार (दिनांक १९) रोजी आयोजित करण्यात आलेल्या मेरी माटी मेरा देश अभियान कार्यक्रम प्रसंगी राजेश पांडे बोलत होते. यावेळी भाजपा पुणे शहर सरचिटणीस वर्षाताई तापकीर, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहुल पाखरे, खडकवासला भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन बदक, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे समूह संचालक सागर सुके, विक्रांत तापकीर, निखिल डिंबळे, एमबीए संचालक डॉ. तानाजी दबडे, प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी, प्राचार्य डॉ. किशोर ओतारी, प्राचार्य प्रा. पंकज भोकरे, प्राचार्य प्रा. किरण पवार उपस्थित होते.
राजेश पांडे पुढे म्हणाले, मेरी माटी मेरा देश अभियानच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची संधी प्रत्येकाला मिळणार आहे. चीन सारख्या मोठ्या राष्ट्राचे रेकॉर्ड मोडण्यासाठी आपण सर्वानी माती हातात घेऊन काढलेले सेल्फी फोटो आपल्या महाविद्यालयात पाठवावेत आणि या अभियानाचे सक्रिय नागरिक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन राजेश पांडे यांनी केले.
वर्षाताई तापकीर म्हणाल्या, आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियान माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येकाला आपण वंदन केले पाहिजे. या अभियानामध्ये नवसह्याद्री शिक्षण संस्थेने घेतलेले परिश्रम आणि सहभाग नक्कीच उल्लेखनीय आहे.
कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाने संकलित केलेली माती कलश मान्यवरांकडे सुपूर्त करण्यात आले. तसेच दहा हजार पेक्षा जास्त सेल्फी असलेला पेन ड्राईव्ह देखील सुपूर्त करण्यात आला. तसेच ७५ औषधी झाडांची रोपे विध्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहुल पाखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नवनाथ गोवेकर व आभार प्रदर्शन एमबीए चे संचालक डॉ. तानाजी दबडे यांनी केले. यावेळी अभियांत्रिकी, डिप्लोमा, फार्मसी, गुरुकुल चे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.