पुणे सोलापूर महामार्गावर ६ कोटी १२ लाखांचा अमली पदार्थ साठा जप्त…
पुणे : मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रदीप झालटे यांना त्यांच्या कार्यालयात खबऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की, सोलापुर ते पुणे हायवे रस्त्यावर देवडी गावच्या फाट्यावर एका हॉटेलजवळ (ता. मोहोळ, जिल्हा. सोलापुर) येथे काहीजण मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विकी करण्याकरीता येणार आहेत. अशी माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक झालटे यांनी मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना याची माहिती दिली त्यानंतर घुगे यांनी पोलिस सहकाऱ्यांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेवरून सापळा रचला.
शनिवार (दि.२१) रात्री १०.३० वा. च्या सुमारास एका चारचाकी गाडी हॉटेल श्री. साई समोरील मोकळया जागेत येऊन थांबली. त्यामधील एक इसम पाठीवर सॅक अडकवुन गाडीतून खाली उतरून आजुबाजुच्या परिसराची पाहणी करू लागला असता, दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलीसांनी त्याला पकडले. पोलिसांनी त्याला त्याचे नाव, पत्ता विचारला असता त्याने दत्तात्रय लक्ष्मण घोडके (रा. मु.पो. औंढी ता. मोहोळ, जि. सोलापुर) असे असल्याचे सांगितले, त्यावेळी साथीदारास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव गणेश उत्तम घोडके (रा. औंढी ता. मोहोळ जि. सोलापुर) असल्याचे सांगितले.
सोलापूर पोलिसांनी त्यांचेकडे तपास केला असता एस. एस. केमीकल लि. (२९/३० चंद्रमौळी एम. आय. डी. सी. मोहोळ) येथे बनवण्याचे साहित्य व कच्चा माल लपवून ठेवल्याचे सांगितल्याने पोलीसांनी सदर ठिकाणी छापे टाकले.सोलापुर ग्रामीण पोलीस दलाच्या या कारवाईत पुणे सोलापूर महामार्गावर या दोन जणांकडून सहा कोटी दोन लाख रुपयांचे मेफेड्रॉन व त्यापासून ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल दहा लाख ९ हजार रुपये असा ६ कोटी १२ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे आणि सहायक निरीक्षक प्रदिप झालटे,फौजदार सुधिर खारगे, खापरे, रविराज कांबळे, राजेंद्र राठोड, महेबुब शेख, अमोल भिसे, देशमुख, अमोल घोळवे, सचिन माने, प्रविण साठे, सिध्दु मोरे, सतिश रूपनर, अविराज राठोड, स्वप्नील कुबेर, संदीप सावंत, अजित मिसाळ, सोलनकर, राजश्री कोल्हे, हरीदास आदलिंगे, समिर पठाण, शिवणे, डाखोरे, थोरात यांनी केली.