भोर तालुक्यात अवकाळीचा भात पिकाला फटका तर रब्बी हंगामातील पिकांना फायदा
भोर: भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भात काढणीची लगबग सुरू असताना बुधवारी (दि. ८ नोव्हेंबर) सकाळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यावेळी काढणीस आलेल्या हळव्या जातीच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भात पिकांची लोळवण झाली असून, काही भाताची गळती झाली आहे.
भोर तालुक्याच्या दक्षिण भागातील वरवडी खुर्द वरवडी डायमुख, वरवडी बुद्रुक, अंबाडे, बालवडी, पाले, पळसोशी, बाजारवाडी, धावडी, खानापूर, हातनोशी, गोकवडी, नेरे, भोर या भागात अवकाळी पावसाने सकाळी जोरदार हजेरी लावली. हा पाऊस रब्बी हंगामातील पेरणीला झालेल्या ज्वारी, हरभरा, भुईमुग आदी पिकाला मात्र, फायद्याचा ठरला आहे.
दुपारनंतर अवकाळी पावसाने दिशा बदलल्यामुळे अंबवडे खोऱ्यातील पिसावरे, वाठार, नांदगाव आपटी, रावडी, टीटेघर, कोरले, रायरी, वडतुंबी, कर्णवड या भागात भात पिकांला फटका बसल्याने हाताशी आलेला घास वाया जाणार आहे. हिरडस मावळ खोऱ्यात भात काढणी झाली असून, जनावरांसाठी ठेवलेला चारा भिजून गेल्यामुळे तो खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दैना उडविली आहे. यामुळे शेतीचे नुकसान ठरणार असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.