मराठा आरक्षण मिळेपर्यंत तीर्थक्षेत्र मांढरदेव येथे राजकीय नेते-मंत्र्यांना प्रदेश बंदी,ग्रामस्थांचा निर्णय
वाई : मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वाई तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पाच दिवसांपासून वाई येथे तीव्र आंदोलन सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाई तालुक्यातील ग्रामीण भागात ही राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी, गाव बंदी केली जात आहे. मांढरदेवी काळुबाई येथील ग्रामस्थांनी ही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण मांढरदेव बंद ठेवण्यात आले आहे.
ग्रामपंचायत मांढरदेवी यांनी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून साखळी उपोषण तसेच गावात राजकीय नेत्यांना बंदी घालून पाठिंबा दिला जात आहे. आणि तसा निर्णय मांढरदेव गावातील ग्रामस्थांकडून घेण्यात आलेला आहे. मांढरदेव हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे बरेच आमदार, खासदार, मंत्री, देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि तसा प्रोटोकॉलही ते आपणास देत असतात. आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.