पुणे सातारा महामार्गावर सारोळे येथे झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार
सारोळे : पुणे सातारा महामार्गावर असणाऱ्या सारोळे (ता.भोर जि. पुणे) येथील हॉटेल अमृता समोर आज शनिवारी (२३ डिसेंबर) सायंकाळी ७ वाजता झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राहुल नथुजी भुरे (वय ३१ वर्षे, सध्या रा. मदर्स रेसिपी कंपनी, मूळ राहणार ता. पवनी जि. भंडारा) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. राहुल हा मदर्स रेसिपी कंपनी येथे कामास होता. रोड क्रॉस करत असताना हा अपघात झाल्याचे समजत आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस व राजगड पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदननसाठी भोर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. राजगड पोलिसांनी व महामार्ग पोलिसांनी पुणे सातारा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे.