साताऱ्यातील दहिवडीतील विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत परीक्षेला न बसण्याचा पवित्रा
सातारा: मंगळवार(दि. ३१ऑक्टोबर)रोजी दहिवडी (ता. माण) येथील महात्मा गांधी विद्यालयात सकाळी नेहमीप्रमाणे शाळा भरेल, असे वाटत असतानाच अचानक सर्व मुले महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जमली आणि घोषणांचा निनाद घुमू लागला. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,जय शिवाजी जय भवानी, आरक्षण नाय तोपर्यंत शाळा नाय. परीक्षेवर बहिष्कार टाकत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही, असा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. त्यामुळे शाळेतील शिक्षकांचाही नाईलाज झाला. जरांगे-पाटील यांना पाठिंबा म्हणून हे आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले की आरक्षण नसेल तर शिकून तरी काय करायचे, आम्हाला सवलत नसल्याने, आमची ऐपत नसल्याने, उच्च शिक्षण घेता येणार नाही. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे. दिले नाही तर पेपर पण नाही, शाळा पण नको, या भूमिकेशी आम्ही ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.