मराठा आंदोलकांची पदयात्रा; मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी बंद, वाचा सविस्तर

पुणे : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात येत आहे. ही पदयात्रा गुरुवारी सकाळी लोणावळा येथून मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून मार्गस्थ होणार आहे.

त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पदयात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी बंद ठेवण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे.

Advertisement

मनोज जरांगे यांची पदयात्रा बुधवारी चंदननगर खराडी बायपास येथून निघून राष्ट्रीय महामार्ग ४८ ने लोणावळ्याला पोहोचणार आहे. राष्ट्रीय महामार्ग ४८ लगत वाकसाई गाव येथे यात्रा मुक्कामी असणार आहे. तर गुरुवारी सकाळी लोणावळा येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुढे वाशीला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे वाहिनीवरील साखळी क्रमांक किमी ५४/४००, पुणे-मुंबई वाहिनीवर साखळी क्रमांक किमी ५३/०००,किमी ५०/०००, किमी ४८/००, खंडाळा उतारावर किमी ४६/२०० खंडाळा बोगदा येथील दुभाजक कट लोखंडी वा सिमेंटचे बॅरीगेट्स लावून तात्पुरते बंद करण्यात येणार आहे.

एकूणच द्रुतगती महामार्गावरून पदयात्रा पुढे जाईपर्यंत गुरुवारी सकाळपासून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर या कालावधीत मुंबईकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात येणार असल्याची माहिती खंडाळा महामार्ग पोलिसांनी एका पत्राद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page