भोर तालुक्यातील पाचलिंगे(मोरवाडी) येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार, आठवड्यातील दुसरी घटना; नागरिकांकडून पिंजरा लावण्याची मागणी
किकवी : भोर तालुक्यातील पाचलिंगे(मोरवाडी) येथील अंकुश रामचंद्र जाधव यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केल्याने कालवड जागीच ठार झाल्याची घटना रविवारी(दि. १८ ऑगस्ट) रात्री घडली. कापूरहोळ-भोंगवली डोंगरात या आठवड्यात ही दुसरी घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वनविभागाच्या वतीने पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. मागील काही दिवसांपूर्वी साळोबाची वाडी(कापूरहोळ) येथे शेतात बांधलेल्या दोन वासरांवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यातील एक वासरू जागीच ठार होऊन एक जमखी झाले होते. या हल्ल्यामुळे अंकुश जाधव या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून वनविभाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी वनविभागाकडे केली आहे. या घटने नंतर परिसरातील नागरिकांना वनविभागाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी
कापूरहोळ-पाचलिंगे-भोंगवली या परिसरातील डोंगरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. बिबट्याला लपण्यासाठी या परिसरात पुरेशा प्रमाणात जागा आहेत. या आठवड्यातील ही दुसरी घटना असून परिसरात बिबट्या व त्याच्या पावलांचे ठसे दिसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे वनखात्याने ही बाब गांभीर्याने घेऊन या परिसरात पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.