किकवीतील खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून मोरवाडीतील तरुणाची आत्महत्या? अजून पर्यंत गुन्हा दाखल नाही
किकवी : सावकाराच्या जाचाला कंटाळून मोरवाडी गावातील दिपक रमेश मोरे (वय ३३ वर्षे) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,भोर तालुक्यातील मोरवाडी गावातील एका तरुणाने किकवी येथील सावकारांकडून पैसे घेतले होते.तरुणाने सावकारांना घेतलेल्या पैश्याच्या दोन पटीने पैसे दिले असतानाही संबंधित सावकारांनी वेळोवेळी तगादा करून दमबाजी करून एक दिवस अगोदर मारहाण देखील केली होती तू मर नाहीतर काय पण कर आम्हांला पैसे आणून दे म्हणत तरुणाला मारहाण केली होती.
तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली गेली. या चार सावकारांच्या जाचाला कंटाळून या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु आत्महत्या होऊन तीन दिवस झाले तरी अजून गुन्हा दाखल नाही. आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून एक दिवस आगोदर या तरुणाला मारहाण करून त्या सावकारांनी आत्महत्येस प्रवृत्त केले असून पोलीस देखील गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप तरुणांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
भोर तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खाजगी सावकारांनी बस्तान बसविले आहे.या सावकारांच्या पठाणी वसुलीला कंटाळून अनेक जण गाव सोडून गेले आहेत तर काहींना आपली घरी दारे विकली आहेत. अशा घटना घडू नये म्हणून खाजगी सावकारांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.