पुणे ते पाचगणी अंतर २२ धावपटूंसह पार; पाचगणीचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरेंची फिटनेससाठी जागृती
पाचगणी : जनतेमध्ये फिटनेसबाबत जागृती व्हावी आणि तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून फिटनेसचे व्यसन लावून घ्यावे, यासाठी पुणे ते पाचगणी हे अंतर २२ धावपटूंसह पाचगणी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी स्वतः धावून पूर्ण केले.
पुणे येथील स्पोर्टिफाय रनिंग ग्रुपने २ डिसेंबर रोजी पुणे ते पाचगणी रिले रनचे आयोजन केले होते. या शर्यतीत २२ धावपटूंनी सहभाग घेतला होता. या धावपटूंनी ११२ किलोमीटरचे अंतर १० तास ८ मिनिटांमध्ये पूर्ण केले. शर्यतीचा मार्ग धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा, शिवाजीनगर, दगडूशेठ गणपती, सारसबाग, सिंहगड रोड, आंबेगाव, पुणे-सातारा रोड, वाई ते पाचगणी असा होता. या धावण्याच्या स्पर्धेला स्पोर्टीफायचे प्रशिक्षक विजय बनसोड यांनी धानोरी येथे रात्री साडेबारा वाजता हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
अंतिम फेरीचा समारोप पाचगणी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक एव्हरेस्ट वीर शिवाजी ननवरे यांनी रवाइन हॉटेल पांचगणी येथे सकाळी १०:३८ वाजता केला. या स्पर्धेमध्ये धावपटूंच्या मदतीसाठी पाच सपोर्ट कार होत्या. स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला पाच किलोमीटरचे अंतर देण्यात आले होते. खंबाटकी घाट आणि पसरणी घाट उभी चढण असल्याने धावताना धावपटूंची चांगलीच दमछाक होत होती. धावताना विजय बनसोड यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन धावपटूंना केले. त्यामुळे धावपटूंनी चांगली आणि जोरदार धाव घेतल्याने मोहीम यशस्वी झाली.
धावपटूंना मार्गदर्शन करताना पाचगणी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी फिटनेसबाबत जागरूकता व व्यसनाधीनतेपासून दूर राहण्यासाठी आणखी मोहिमांचे आयोजन करण्याची विनंती विजय बनसोड यांना केली. त्यांनी सर्व धावपटूंचे अभिनंदन केले.
या वेळी बोलताना विजय बनसोड म्हणाले की, लवकरच या मोहिमेचे इंडियाबुक रेकॉर्डसाठी नामांकन भरले जाणार आहे. अशा प्रकारच्या आणखी महिमांचे आयोजन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.