निरगुडसर येथे २० गायींचा मृत्यू तर ४० गायींची प्रकृती गंभीर, बटाट्याचा पाला खाल्ल्याने विषबाधा
पुणे : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाल्याने २० गायींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ७) घडली असून, या गायी राजस्थानी व्यावसायिकाच्या आहेत.यामध्ये आतापर्यंत त्यांचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अजून ४० गायींची प्रकृती गंभीर आहे.
एका शेतकऱ्याचा शेतात कापून ठेवलेला बटाट्याचा पाला गायींना खाण्यासाठी आणला होता. हा पाला खाल्ल्यानंतर गायींना विषबाधा झाली असून आतापर्यंत २० गायी मृत्युमुखी पडल्या आहेत आणि अजून सुमारे ४० गायी मरणाच्या दारात आहेत. गुरांचे सरकारी डॉक्टरांनी गायींवर औषधोपचार केले असून, विषबाधा मोठ्या प्रमाणात झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.या गायांचा कुठलाही विमा नसल्याने या राजस्थानी व्यावसायिकास नुकसान भरपाई मिळणे कठीण आहे.
हे राजस्थानी भटके लोक असून गीर गायीचे संगोपन करतात आणि गायींसाठी परिसरातील चारा किंवा पाला विकत घेऊन गायींचे पोषण करतात. त्याप्रमाणे त्यांनी हा बटाट्याचा पाला घेतला आहे. याबाबत पाहणी करून त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. बटाट्यावर कीटकनाशक मारले असावेत आणि तो पाला गायींच्या खाण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, खरे कारण तपासणी अहवाल आल्यावरच समजेल असे निरगुडसर चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तळेकर यांनी सांगितले.