पाच हजाराच्या लाच प्रकरणी पुरंदर तालुक्यातील तलाठी आणि पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पुरंदर : बक्षीसपत्राची नोंद सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी ५ हजार रूपयाची लाच घेताना पुरंदर तालुक्यातील सजा सोनोरीमधील तलाठी आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहेत.
तलाठी निलेश सुभाष गद्रे (वय ४२ वर्षे तलाठी, सजा – सोनोरी ता. पुरंदर, जि. पुणे) आणि आदित्य मधुकर कुंभारकर (वय २१ वर्षे, रा. वजपुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या आजोबांनी तक्रारदारांना बक्षीसपत्राने ३९ गुंठे जमीन दिली होती. सदरील बक्षीसपत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी रितसर अर्ज केला होता. तलाठी निलेश गद्रे यांनी त्यांच्याकडे ५ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आरोपी आदित्य कुंभारकर यांनी तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रूपयाची लाच तलाठी गद्रे यांच्यासाठी घेतली असल्याचे कबूल केले. अँटी करप्शनच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे.