तब्बल ५५ लाख रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
नसरापूर : राजगड पोलिस स्टेशन येथे आज बुधवार (दि.८ नोव्हेंबर) रोजी दुपारी तब्बल ५५ लाख ८२ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी ख्रिस्तोफर रिचर्ड हेन्ड्रीक्स (रा.११५ नलिनी अपार्टमेंट, पुलगेट सोलापुर रोड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिस्तोफर यांनी कांबरे ॲग्रो एल.एल.पी. या कंपनीचे नावे जमीन घेणेसाठी कंपनी कडून १ कोटी २८ लाख ७० हजार रूपये घेतले होते. कंपनीकरीता त्यांनी स्वताचे नावावर फक्त चार एकर जमिन खरेदी केली. या जमिनीची किंमत ४२ लाख ३७ हजार ९०० एवढी आहे. बाकी रकमेच्या बदल्यात त्यांनी काही जमीनी स्वताच्या नावावर कुलमुखत्यारपत्र व साठेखत तसेच खरेदीखत करून घेतल्या. त्यास जमीन कंपनीच्या नावावर करून दे म्हणुन फिर्यादी व कांब्रे ॲग्रो एल.एल.पी. कंपनीचे कार्यकारी संचालक जोहाननेस मायकल नेथेर (वय ६७ वर्षे,रा. कांबरे खेबा, ता. भोर जि पुणे) यांनी विनंती केली.ख्रिस्तोफर यांनी त्यानंतर नेथेर यांना फक्त ३० लाख ५० हजार रूपये परत केले. बाकी जमीनी स्वताचे नावावर ठेवुन कंपनीची पुर्व परवाणगी न घेता स्वताचे आर्थिक फायदयासाठी विक्री करणे सुरू केली. आता पर्यन्त त्यांनी बहुतेक जमिनीची विक्री केली आहे. यामुळे फिर्यादी जोहाननेस मायकल नेथेर यांनी त्यांचा स्वतःचा व कंपनीचा विश्वासघात करून ५५ लाख ८२ हजार शंभर रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी ख्रिस्तोफर रिचर्ड हेन्ड्रीक्स यांच्या विरुद्ध आज बुधवार (दि.८ नोव्हेंबर) रोजी राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुतनासे करीत आहेत.