करंदी व्हॅली रिसॉर्ट परिसरात चंदनाच्या झाडाची चोरी करणारे दोन चोरटे राजगड पोलिसांच्या ताब्यात
नसरापूर : करंदी खे.बा.(ता.भोर) गावच्या हद्दीतील करंदी व्हॅली रिसॉर्ट परिसरात चंदनाचे झाड तोडून नेणाऱ्या २ आरोपींना राजगड पोलिसांनी अटक केली आहे. मुलायम सिंग(वय ३६ वर्ष) आणि मंगल सिंग(वय २२ वर्ष, दोघेही मूळ रा. जि. कटनी, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी करंदी व्हॅली रिसॉर्टचे मॅनेजर राम सुधाकर श्रीमाळे(वय ३० वर्ष, रा. करंदी खे.बा. ता.भोर) यांनी फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंदी व्हॅली रिसॉर्ट परिसरात आज गुरुवारी(दि. २१ मार्च) सकाळी ९ वाजता काही लोक चंदनाचे झाड तोडून घेऊन जात असताना फिर्यादी रिसॉर्टचे मॅनेजर श्रीमाळे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सतर्कता दाखवत कर्मचाऱ्यांच्या मदतीने चंदनाचे झाड तोडणाऱ्या मुलायम सिंग आणि मंगल सिंग यांना पकडुन राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. राजगड पोलीसांनी आरोपींकडून चंदन व गुन्ह्यात वापरलेली करवत जप्त केली आहे. तसेच दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार ढावरे करीत आहेत.