खोपी येथे जमिनीच्या वादातून १५ जणांची दांपत्यास मारहाण; राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नसरापूर : खोपी (ता. भोर) येथे जमिनीच्या वादातून १५ जणांनी दांपत्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. निलीमा सुनील साबळे (वय ४५ वर्ष, रा. सध्या आंबेगाव, पुणे; मूळगाव खोपी, ता.भोर) यांनी याबाबत राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ‘जमिनीला कुंपण का करता?’ असे विचारल्याने फिर्यादी व त्यांचे पती सुनील साबळे यांना सनी हनुमंत शिवरकर (रा. खोपी) व इतर ६ मुले व ८ महिलांनी मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १७ मे) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सनी हनुमंत शिवरकर व इतर सर्व चार दुचाकीवरून एकत्र जमाव जमवून जमीन गट क्रमांक २३३,२३४,२३५,२३६ मध्ये कुंपण करत होते. त्यावेळी निलीमा साबळे यांनी त्यांना, ‘आमच्या जमिनीत कुंपण का करता?’ असे विचारले. त्यावर त्यांनी निलीमा यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ करून धमकी दिली. यावेळी त्यांचे पती सुनील हे आले असता त्यांनासुद्धा धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात सनी शिवरकर व इतर १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सतीश चव्हाण करत आहेत.