“आख्खा गाव नडला पण वाघ नाय पडला” त्या बॅनरची सगळीकडे चर्चा.
“शिरूर : शिरुर तालुक्यात नुकत्याच आठ ग्रामपंचायतच्या पंचंवार्षिक निवडणुका पार पडल्या. त्यात अनेक गावातील दिग्गजांचा पराभव झाला. यावेळेस प्रत्येक गावच्या निवडणुकीत तरुणाईने सक्रिय सहभाग घेत सोशल मिडिया तसेच प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देत अनेक गावात सत्ताधाऱ्यांना चारिमुंड्या चित करत अस्मान दाखवले. सध्या रांजणगाव गणपती येथे लावण्यात आलेल्या अशाच एका बॅनरची रांजणगाव पंचक्रोशीसह सगळीकडे चर्चा आहे.
रांजणगाव गणपती मध्ये तीन पारंपरिक विरोधकांनी एकत्र येत सत्तेसाठी मोट बांधली होती. त्यामुळे त्याची भल्याभल्यांनी धास्ती घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. परंतु शिवसेना (शिंदे गटाचे) युवासेना पुणे जिल्हाध्यक्ष तसेच रांजणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी विरोधकांच्या ६ नंबर वार्डातुन मी किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगनात उतरणार असल्याचे जाहीर करत पॅनल मध्ये एक नवचैतन्य निर्माण केले होते.
त्यानंतर वार्ड क्रं ६ मध्ये एकही उमेदवार उभा राहण्यासाठी तयार नसताना बापुसाहेब शिंदे यांनी हे शिवधनुष्य लिलया पेलत त्यांच्या पत्नी अर्चना शिंदे यांना वार्ड क्रं ६ मध्ये उभ केल. शिंदे यांचं स्वतःच त्या वार्डात एकही मतदान नसतानाही त्या चांगल्या मताधिक्याने निवडुन आल्या. विशेष म्हणजे वार्ड क्रं 6 मध्ये भिमाजी खेडकर आणि मानसिंग पाचुंदकर हे स्वतः राहत असल्यामुळे हा वार्ड त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. असं असतानाही अर्चना शिंदे यांच्या बाजुने मतदारांनी कौल दिला. त्यामुळे या विजयाची सगळ्या गावासह तालुक्यात चर्चा आहे.
रांजणगाव गणपती येथील विरोधकांचे प्राबल्य असलेल्या वार्डात बापुसाहेब शिंदे यांची पत्नी उभी असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यातच तिन्ही विरोधकांनी एकत्र येत अर्चना शिंदे यांचा कसल्याही परिस्थितीत पराभव करायचाच असा चंगच बांधला होता. त्यासाठी त्यांनी साम, दाम, दंड, भेद या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर वापर केला. परंतु मतदारांनी मात्र अर्चना शिंदे यांच्याच बाजुने कौल दिला. त्यामुळे विरोधकांना अपयश आले. रांजणगाव गणपतीचे गाडा शौकीन तसेच उद्योजक अभिजित बत्ते आणि अक्षय बत्ते यांनी रांजणगाव गणपती येथे पुणे- -नगर महामार्गावर “आख्खा गाव नडला पण वाघ नाय पडला” अशा अशा आशयाचा बॅनर लावला असुन सध्या रांजणगाव गणपती सह तालुक्यात या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे.