लक्ष लक्ष मशालींच्या प्रकाशाने उजळली रायगडची राजसदर
सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीसाठी जोरदार तयारी सुरू असताना शिवराज्याभिषेक दिन सेवासमिती मुंबई व येसुबाई फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि दिवाळीच्या तोंडावर रायगडावरील राजसदरेसमोर मशाल रॅली काढण्यात आली.
पारंपारिक वेषातील मावळे हातात मशाली आणि मनामध्ये दाटलेली शिवभक्ती अशा जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवभक्तांनी राजसदर मशालींच्या प्रकाशाने उजळवून टाकली.
शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे कार्यवाहक सुनील पवार, येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक व सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या सहभागाने या मशाल रॅलीमध्ये सुमारे २०० हून अधिक शिवभक्तांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमापूर्वी रायगडावर अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला तरी सुद्धा शिवभक्तांनी हार न मानता मशाल रॅलीचा प्रकाश राजसदरेवर पसरवला. होळीच्या माळापासून ते राजसदरेपर्यंत पारंपारिक पोशाखांमध्ये शिवभक्तांनी जाऊन मशाल रॅली काढली आणि येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा दिल्या.
राज सदरेच्या समोरील जागेमध्ये हजारो मशाली उजळवत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर प्रकाशमान करण्यात आला. हे मनोहारी दृश्य अनुभवण्यासाठी असंख्य शिवभक्तांनी हजेरी लावली होती. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य आपल्या कर्तुत्वाने उभारले. त्यांच्यामुळेच हिंदू धर्मातील नागरिकांना आपले सण निर्भयपणे साजरा करता येत आहेत.
दिवाळीचा पारंपारिक प्रकाशमान सण आपण साजरा करत असताना ऐतिहासिक गडकोट किल्ले मात्र ऐन दिवाळीत अंधारात राहतात. त्यामुळे ” एक पणती आपल्या राजासाठी’ ही संकल्पना सुनील पवार व सुहास राजेशिर्के यांनी पूर्णत्वाला नेली. तत्पूर्वी येथील शिरकाई देवीची पारंपारिक पद्धतीने ओटी भरण्यात आली तेथून शिवभक्तांनी होळीच्या माळाकडे प्रस्थान करत तेथून राज सदरेवर प्रयाण केले व हजारो मशालींनी राजसदर उजळून गेली होती.