शेततळे योजनेत पुणे विभागाची आघाडी
पुणे : राज्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ या वैयक्तिक शेततळ्यांमध्ये २ हजार ९१ शेततळ्यांची उभारणी करून पुणे विभागाने आघाडी घेतली आहे.
त्यातून सुमारे तीन ते साडेतीन हजार एकर क्षेत्रावरील पिकांना शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होणार असल्याची माहिती पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी यांनी दिली. पुणे विभागात पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यात खरीप हंगामात मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याचा फटका पिकांना बसला आहे. तसेच परतीच्या पावसाचीही अपेक्षित हजेरी नसल्यामुळे दृष्काळसदृश स्थितीत शेतकऱ्यांचा कल संरक्षित सिंचनाकडे वाढविण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. त्यासाठी करण्यात आलेले सुयोग्य नियोजन, शेतकऱ्यांचा मिळालेला चांगला प्रतिसाद आणि सांघिक कामगिरीमुळेच पुणे विभागात सर्वाधिक शेततळ्यांची उभारणी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
मागेल त्याला शेततळे योजनेत सुमारे ७५ हजार रुपयांइतके सरासरी अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. आकारमानानुसार त्यामधील अनुदान रकमेतही बदल आहे. तसेच प्लास्टिक आच्छादनांसाठीही ७५ हजार रुपयांइतके अनुदान आहे. राज्यात ४ हजार ४६१ शेततळ्यांची उभारणी पूर्ण झाली आहेत. तर, त्यामध्ये पुणे जिल्ह्यात ४९४, अहमदनगरमध्ये ९४९ आणि सोलापूरमध्ये ६४८ मिळून पुणे विभागात २ हजार ९१ शेततळी तयार झालेली आहेत. याचा विचार करता राज्यात पुणे विभागाचा तब्बल ४७ टक्क्यांइतका सर्वाधिक वाटा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट १४ कोटी ८ लाख रुपयांचे अनुदानही जमा करण्यात आल्याची माहिती नाईकवाडी यांनी दिली.