पुणे रिंगरोडचे काम पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता, भूसंपादनाचे ६० टक्के काम पूर्ण
पुणे : शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या रिंगरोडचे प्रत्यक्ष काम पुढीलवर्षी सुरु होण्याची शक्यता आहे. पश्चिम भागातील चौदा गावांतील भूसंपादनाचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, या भागातील रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने प्रक्रीया सुरू केली आहे.
डिसेंबर महिन्यात या निविदा काढल्यानंतर पुढील वर्षी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या रिंगरोडला विशेष राज्य महामार्गाचा दर्जा दिला आहे. हा प्रकल्प वेळेत होण्यासाठी रिंगरोडचे पाच टप्पे करण्यात आले आहे. एका बाजूला भूसंपादनाचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष रिंगरोड तयार करण्याचा आराखडा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
पश्चिम रिंगरोड हा केळवडे (ता. भोर) ते उर्से (ता. मावळ) असा सुमारे ६५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. पश्चिम भागातील १४ गावांतील सुमारे साठ टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागाचा रिंगरोड विकसित करण्यासाठीची निविदा प्रक्रिया महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत निविदा मागवून पुढील वर्षी या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याचे नियोजन “एमएसआरडीसी’कडून करण्यात आले आहे
रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम रिंगरोड असे दोन भाग आहेत. पूर्व व पश्चिम रिंगरोडची एकूण लांबी १३६ कि.मी. असून रुंदी सुमारे ११० मीटर इतकी असणार आहे. आठ बोगदे, तीन छोटे पूल, दोन मोठे पूल आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरुन अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार आहे. त्यामुळे ६५ कि.मी. लांबीचा रिंगरोडचे काम लवकर होण्यासाठी पाच टप्पे करण्यात आले असून, एकाच वेळी पाच टप्प्यातील रिंगरोडचे काम सुरू करण्याचा मानस “एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पश्चिम रिंगरोडसाठी सुमारे ६९५ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार असून भूसंपादनासाठी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
असा असणार रिंगरोडचा मार्ग
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से (ता. मावळ) येथून सुरुवात परंदवाडी – धामणे – बेबडओहोळ – चांदखेड पाचाणे (ता. मावळ) – – पिंपळोली- केमसेवाडी – जवळ- पडळघरवाडी- रिहे – मातेरेवाडी – घोटावडे – अंबडवेट- भरे – कासार आंबोली – उरावडे आंबेगाव मारणेवाडी – – – मोरेवाडी – भरेकरवाडी – कातवडी (ता. मुळशी) – बहुली – भगतवाडी – सांगरुण – मांडवी बुद्रुक – मालखेड – वरदाडे – खामगाव मावळ घेरा सिंहगड – मोरदरवाडी – कल्याण रहाटावडे (ता. हवेली) – – रांजे- कुसगाव – खोपी- कांजळे- केळवडे (ता. भोर) येथील पुणे-सातारा महामार्गाला जोडला जाणार आहे.