तात्कालीन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी निनामी अर्जावरून केलेल्या बदली बाबत मॅट कोर्टाचे ताशेरे; इंदापूरच्या ते तीन पोलीस कर्मचारी राज्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ठरले आयकॉन
पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रवीण भोईटे, मनोज गायकवाड व प्रवीण शिंगाडे यांच्या विरोधात दि.१ डिसेंबर २०२२ रोजी सखाराम आर शिंदे या नावाच्या व्यक्तीने बारामती उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता. या तक्रारी अर्जाची कोणती खातरजमा न करता सदर पोलीस कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली केल्याप्रकरणी तत्कालीन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचे ताशेरे मॅट कोर्टानी ओढले असून सदर पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ इंदापूर पोलीस स्टेशनला पूर्वपदावर नियुक्त करा असा आदेश देण्यात आले आहेत.
केवळ प्राप्त झालेल्या तक्रारीवरून शासकीय कर्मचाऱ्यांची बदली करता येत नसून त्याबाबत संबंधित तक्रारदाराला बोलावून सदर तक्रारीची सखोल चौकशी अथवा खातर जमा करणे बंधनकारक आहे असा निर्वाळा मुंबई मॅट चे प्रशासक देबाशिष चक्रवर्ती या कोर्टाने जारी केलेल्या सदर प्रकरणाबाबत दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैद्य धंदेवाल्याशी संबंध ठेवत त्यांना मदत करून त्याच्या माध्यमातून अमाप पैसा गोळा केल्याची निनामी स्वरूपाची तक्रार सखाराम आर शिंदे (इंदापूर) या व्यक्तीच्या नावे देण्यात आली होती. मात्र या तक्रारीनंतर संबंधित तक्रारदाराला बोलावून सखोल चौकशी करण्यात आली नाही. तसेच संबंधित नावाचा तक्रारदार अस्तित्वात नसल्याने तो मिळून आला नाही. तरीही कोणतीही खातरजमा न करता संबंधित तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली इंदापूर पोलीस स्टेशन येथून पुणे ग्रामीण मुख्यालय या ठिकाणी करण्यात आली होती.
सदर बदलीनंतर संबंधित पोलीस कर्मचारी यांनी पोलिस खात्यातील वरिष्ठांकडून कोणताही न्याय मिळणार नाही असे जाणवताच थेट मॅट कोर्टात न्याय मागण्यासाठी प्रकरण दाखल केले. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाजूने ॲड भूषण बांदीवडेकर व ॲड गौरव बांदीवडेकर यांनी याचिकाकर्त्याची बाजू भक्कमपणे मांडली. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरती कसा अन्याय झाला आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी कशाप्रकारे आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे हे मॅट प्रशासकीय सदस्यांसमोर पुराव्यानिशी सिद्ध केले. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ ७ दिवसात पुन्हा इंदापूर पोलीस स्टेशनला पूर्वपदावरती नियुक्ती करा असा आदेश जारी केला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना अखेर मॅट कोर्टाने न्याय दिला आहे.
मॅट ऐतिहासिक कोर्टाचा निर्वाळा..!!
मुंबई मॅट चे प्रशासकीय सदस्य देबाशिष चक्रवर्ती यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची बदली केवळ तक्रार केली एवढ्या कारणावरून करता येत नाही. तसेच शासनाच्या ७ ऑक्टोंबर २०१६ व ८ ऑक्टोबर २०१७ च्या जीआर नुसार संबंधित तक्रारीचे निरसन होणे गरजेचे आहे. त्याबाबत तक्रारदाराला बोलावून सदर प्रकरणाची खातरजमा करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.
आता निनामी अर्जापासून पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका…?
नुकतेच मुंबई मॅट कोर्टाने तक्रारदार पोलीस कर्मचारी प्रवीण भोईटे, मनोज गायकवाड व प्रवीण शिंगाडे यांच्या तक्रारीवरून एक दिशादर्शक निर्णय दिला आहे. सदरचा निर्णय हा राज्यातील खोट्या निनामी अर्जावरून होत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत मोठा निर्णय असून यापासून राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वरील तीनही पोलीस कर्मचारी राज्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आयकॉन ठरले आहेत.