बहिणीला भेटायला निघालेल्या भावाचा भरधाव डंपरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
पुणे : भाऊबीजेनिमित्त बहिणीला भेटायला निघालेल्या भावाचा त्याच्या दुचाकीला भरधाव डंपरने धडक दिल्याने घडलेल्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१५ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी आंबेगाव पठार येथे घडली.
पंकज मनोहर पायगुडे (वय २९ वर्षे, रा. धायरी फाटा) असे डंपरच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तन्मय मनोहर पायगुडे (वय २६ वर्षे, रा. धायरी फाटा) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपरचालक हिमांशू मोहनलाल चोप्रा (वय ३६ वर्षे, वडगावशेरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पंकज पायगुडे हा भाऊबीजेनिमित्त बहिणीला भेटायला दुचाकीवरून निघाला होता. धायरीवरून कात्रजकडे जात असतांना नवले पुलाजवळील महालक्ष्मी ग्रेनाईड दुकानासमोर पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने पंकजच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातामध्ये पंकजचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.