बोगस जात प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या दिवळे ग्रामपंचायत सदस्याचे जात प्रमाणपत्र रद्द
कापूरहोळ : दिवळे(ता.भोर) येथील एका ग्रामपंचायत सदस्याला चांगलाच हादरा बसला आहे. कुणबी(इतर मागास वर्ग) प्रवर्गातील बोगस जात प्रमाणपत्राद्वारे ग्रामपंचायत सदस्य पद मिळवलेल्या कृष्णा बबन बाठे(रा.दिवळे, ता.भोर) यांचे जात प्रमाणपत्र पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. याबाबत सुनील सुभाष पांगारे(रा.दिवळे, ता.भोर) यांनी तक्रार दाखल केली होती. या कारवाई मुळे बोगस जात प्रमाणपत्राद्वारे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पद मिळवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिवळे(ता.भोर) येथील पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक दि. १५ जानेवरी २०२१ साली झाली. यावेळी तेथील वॉर्ड क्र. ३ मध्ये कृष्णा बाठे यांनी तिथे इतर मागास वर्गासाठी राखीव असणाऱ्या जागेवर निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी अर्ज भरताना दिलेल्या शपथ पत्रांमध्ये त्यांची जात कुणबी(इतर मागास वर्ग) असल्याचे नमूद केले. त्यावेळी त्यांचा अर्ज वैध ठरला व ते निवडणूक लढवून निवडून आले. सदस्य कृष्णा बबन बाठे यांनी उपविभागीय अधिकारी भोर यांच्याकडुन ‘कुणबी’ हे इतर मागास वर्ग जात प्रमाणपत्र क्रमांक ८०६, दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी प्राप्त केले होते. परंतु यावर आक्षेप घेत कृष्णा बाठे यांनी या जात प्रमाणपत्राच्या आधारे कुणबी(इतर मागास वर्ग) साठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायत सदस्य या पदाच्या आरक्षणाचा गैरहेतूने लाभ मिळवून बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले जात प्रमाणपत्र रद्द करावे, अशी तक्रार पुणे जात पडताळणी समितीकडे दिवळे येथीलच सुनील सुभाष पांगारे यांनी दि. २१ जून २०२१ रोजी केली.
तक्रारदार पांगारे यांनी सादर केलेल्या पुराव्याची खात्री करण्याचे आदेश समितीने दक्षता पथकचे पोलीस निरीक्षक यांना दिले. त्यानुसार संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून चौकशी अहवाल समितीस सादर करण्यात आला. यामध्ये त्यांना सदरील नोंदीचे लिखाण इतर नोंदिंपेक्षा वेगळे असल्याचे तसेच नोंद करण्यासाठी वापरलेली शाई देखील वेगळी असल्याचे आढळून आले. त्यानुसार पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष डॉ. दिनेश डोके, सदस्य डॉ. दीपक खरात, सदस्य सचिव संतोष जाधव यांनी हे प्रकरण अंतिमतः निकाली काढत कृष्णा बाठे यांचे कुणबी(इतर मागास वर्ग) प्रवर्गातील जात प्रमाणपत्र रद्द केले. खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र बनविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला असून राजकीय आरक्षण मिळवण्याच्या हेतूने केलेली ही कृती म्हणजे अर्जदार कृष्णा बाठे यांनी शासन धोरणाची व राज्यघटनेने सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केलेल्या तरतुदींचे उल्लघंन केले असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे.
सदरील जात प्रमाणपत्र खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळवले असल्याने कृष्णा बाठे यांचे ग्रामपंचायत सदस्य पद लवकरात लवकर रद्द करण्यात यावे व शासनाची फसवणूक केल्याबद्दल संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सुनील पांगारे व दिवळे ग्रामस्थांनी केली आहे.