पुणे जिल्ह्यातील ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त
पुणे: पुणे जिल्ह्यात शुक्रवारपासून (ता.२४) ढगाळ हवामान तयार होत आहे. याचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. ज्वारी पिकांबरोबरच विविध ठिकाणी भाजीपाला पिकांवर किडी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सध्या जिल्ह्यातील अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर कधी थंडी अशी स्थिती आहे. त्यातच वाढीच्या व पेरणीच्या अवस्थेत असलेल्या ज्वारी पिकांवरही रोग, किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे.
यामुळे काही शेतकरी पेरणी करावी की नाही, अशा संभ्रमात आहेत. ढगाळ हवामानामुळे जोमात आलेल्या पिकांवर विविध कीडरोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे.
ढगाळ हवामानामुळे प्रामुख्याने कांद्यावर करपा, आकडी या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यापासून थंडीस सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरवात केली आहे.
गेल्या महिन्यात पेरणी झालेल्या ज्वारीची पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. हरभरा पिकांची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील भात पिकांची वेगाने काढणी सुरू आहे. बाजरीची काढणी अंतिम टप्यात आहे. मका पीक काढणीच्या व कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. त्यातच या ढगाळ वतावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.