वाईतील कृष्णा नदीवरील पुलाची ब्रिटिशकालीन पुलाला साजेशी रचना; पुणे बिल्डर असोसिएशनच्या शिष्टमंडळाकडून पुलाची पाहणी
वाई : बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र शाखा पुणेच्या सदस्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या येथील कृष्णा पुलाची पाहणी केली. हा पूल बांधताना आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. पुलाच्या तांत्रिक बाबी व सौंदर्य तपासण्यात आल्याचे या सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शहराच्या किसनवीर चौक ते सोनगीर वाडी या दोन भागांना जोडणारा कृष्णा नदीवरील ब्रिटिश कालीन जुन्या पुलाची मुदत संपल्याने त्याजागी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने नव्याने पूल बांधण्यात आला आहे. पुणे स्थित टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने जुना पूल पाडून अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणाचा वापर करून एक वर्षात पूल उभारला. मागील दोन वर्षात राज्यभरात नव्याने उभारण्यात आलेले पूल इमारती यांचे मानांकन महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात येते.
हा पूल उभारणाऱ्या टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बिल्डर असोसिएशनकडे मानांकन मिळवण्यासाठी सहभाग नोंदवला आहे. यापूर्वीच पुलाच्या बांधकामाचे, तांत्रिक विश्लेषणाचे सादरीकरण केले आहे. पूर्वीच्या पुलासारखाच दिसणारा हा नवीन पूल उभारण्यात आला असून त्याला जुन्या पुलासारखेच दगडी संरक्षक रेलिंग करण्यात आले आहे. शहरातील कृष्णा नदीवरील घाट व ऐतिहासिक पार्श्वभूमीला अनुसरून पूर्वीच्या ब्रिटिशकालीन पुलाला साजेशी पुलाची रचना करण्यात आले आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भरच पडली आहे.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने बारा सदस्यांची समिती येथील कृष्णा नदीवरील पूल परीक्षण करण्यासाठी आली होती. यामध्ये इंजिनियर आर्किटेक्चर स्ट्रक्चरल ऑडिटर,स्टील डिझायनर आणि बांधकामाचे तांत्रिक विश्लेषण करणारे सदस्य या शिष्टमंडळात होते. पुढील काही दिवस राज्यभरात सहभाग नोंदविलेल्या पूर्ण झालेल्या कामांचे परीक्षण ही समिती करणार आहे.यानंतर मानांकन जाहीर करण्यात येणार आहेत.
यावेळी पुलाच्या बांधकामाची तांत्रिक माहिती देण्यासाठी टी अँड टी इन्फ्रा तर्फे जनरल मॅनेजर नवनाथ येवले, प्रोजेक्ट इंचार्ज विशाल कांबळे, प्रोजेक्ट समनव्यक स्नेहल देशपांडे, वरिष्ठ अभियंता अनिरुद्ध टेकाळे उपस्थित होते. पालिका मुख्याधिकारी संजीवनी दळवी आणि आरोग्य निरीक्षक सागर सारतापे यांनी पूल व कृष्णा नदी परिसर स्वच्छ केला होता.