अग्निपंख फाउंडेशनने बांधलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वर गडावरील जि.प.प्राथमिक शाळेचे २६ नोव्हेंबर रोजी लोकार्पण
भोर : भोर तालुक्यातील रायरेश्वर गडावर अग्निपंख फौंडेशनने बांधलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन शालेय इमारतीचे लोकार्पण रविवार(दि.२६ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. शाळेच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण उद्योजक पुनीत बालन, ऑलिम्पिकवीर ललिता बाबर यांच्या शुभहस्ते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० ते ११ या वेळात समाज प्रबोधनकार गणेश शिंदे यांचे प्रवचन ठेवण्यात आले आहे.
शाळा बांधण्याची संकल्पना कशी तयार झाली ?
पुण्यातील तळजाई कट्ट्यावरील सभासद, श्रीगोंदा सायकल असोसिएशन शिवदुर्ग ट्रेकर श्रीगोंदा, बेलवंडी ट्रेकर्स बेलवंडी आदींच्या सभासद ट्रेकिंगनिमित्त रायरेश्वर गडावर आले होते. त्यावेळी त्या सभासदांना तेथील शाळेची झालेली जुनी इमारत लक्षात आली आणि त्यांनी महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर शाळेला भेट दिली. त्या ठिकाणी १५ ते १७ विद्यार्थी जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये शिक्षण घेत असल्याचे लक्षात आले. त्यांनतर ट्रेकिंग मध्ये असलेल्या उद्योजक प्रकाश कुतवळ यांनी हा विषय अग्निपंख फाउंडेशनचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब काकडे यांच्यापर्यंत नेला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या कार्यास होकार दर्शवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या रायरेश्वराच्या साक्षीने केली, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शाळेसाठी इमारत उभारणी करण्याचे कामाची संधी अग्निपंख फाउंडेशनला मिळालिये या पेक्षा मोठे ते काय? ही संधी ओळखून अग्निपंख फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आणि इमारत उभारण्याचा संकल्प मांडला. त्यास त्यांनी संमती दिली आणि जिल्हा परिषदेच्या परवानगीने शाळेच्या बांधकामास अग्निपंख फाउंडेशनला परवानगी मिळाली. या शाळेसाठी पुण्यातील तळजाई भ्रमन मंडळाने देखील आर्थिक सहकार्य केले आहे. गडावर बांधकाम साहित्यांची ने-आण करण्यासाठी रायरेश्वर ग्रामस्थांची मोठी मदत झाली. आणि यातूनच सुसज्ज वर्ग असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रायरेश्वरची नवी इमारत उभी राहिली.
विशेष म्हणजे भोर तालुक्यातील कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना, उद्योजकांना जे जमले नाही ते अग्निपंख फाउंडेशन(श्रीगोंदा) यांनी करून दाखवल्या बद्दल त्यांच्या या कार्याचे भोर तालुक्यात सर्व स्तरावर कौतुक होत आहे.