२१ लाखांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी महिला सरपंचाला अटक

श्रीगोंदा : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसात राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या घडामोडी घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी श्रीगोंदे तालुक्यातील सरपंच महिलेला लाच घेताना अटक केली होती.

आता पुन्हा एकदा श्रीगोंदे तालुक्यातून एक मोठी बातमी आली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील भावडी ग्रामपंचायतच्या महिला सरपंच धनश्री अर्जुन करनोर याना अटक करण्यात आली आहे. २१ लाख २३ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सरपंच करनोर यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, जामीनअर्ज फेटाळल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. विविध चौकशीअंती विस्तार अधिकारी पोपट यादव यांच्या फिर्यादीवरून ग्रामसेवक, सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

भावडी ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अपहार झाल्याच्या तक्रारी आलेल्या होत्या. याची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सूत्र हलवत कारवाई व चौकशी करण्याचे आदेश दिले. गटविकास अधिकाऱ्यांनी सहायक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी करा असे आदेशित केले.

परंतु असे होऊनही अनेक दिवस ग्रामपंचायतीचे नमुना १ ते ३३, तसेच विहीत विकासकामांच्या निविदा नस्ती, मूल्यांकन, काम पूर्णत्वाचे दाखले आदी दप्तर उपलब्ध करुन दिले नाही. त्यानंतर मग प्रशासनाच्या चौकशी समितीने बँक ऑफ महाराष्ट्र, श्रीगोंदे शाखेत असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या शासकीय बँक खात्याची माहिती मागवून घेतली. यात समोर आले की, ग्रामनिधी, पाणीपुरवठा निधी, चौदावा व पंधराव्या वित्त आयोग निधीतून वेळोवेळी २१ लाख २३ हजार ३५२ रुपये काढले गेले आहेत. परंतु याचा कोणताही हिशोब त्यांना न देता आल्यामुळे महिला सरपंच धनश्री अर्जुन करनोर यांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page