उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत लोणंदमध्ये वृद्धाचा मृत्यू
लोणंद : सातारा जिल्ह्यात सर्वत्र गळीत हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यामध्ये 16 साखर कारखाने सुरू झाल्याने महामार्गासह सर्व प्रमुख रस्त्यांवर उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि बैलगाड्या दिसू लागल्या आहेत.
उसाची वाहतूक वाढल्याने अपघातही वाढले आहेत. लोणंदमध्ये या ऊस वाहतुकीचा शुक्रवारी पहिला बळी गेला. शहरातील लोणंद ते खंडाळा रस्त्यावर नवी पेठ परिसरात उसाची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. गणी कासम कच्छी (वय ६०, रा. लोणंद) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक बिरअप्पा शंकर ऐनापुरे (रा. बळवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) याच्यावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
खंडाळा तालुक्यातही उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे सातारा-पुणे महामार्गासह प्रमुख रस्त्यांवर ऊस वाहतूक सुरू आहे. परिणामी, कुठे वाहतूक कोंडी तर कुठे अपघात होत आहेत. यंदा हंगाम सुरू झाल्यानंतर लोणंद शहरात या वाहतुकीचा पहिला बळी गेला. शुक्रवारी दुपारी लोणंद ते खंडाळा रस्त्यावर गणी कच्छी हे शास्त्री चौकाकडे निघाले होते. यावेळी चुकीच्या पद्धतीने ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर-ट्रॉलीने कच्छी यांना जोरदार धडक दिली. यामध्ये कच्छी यांचा जागीच मृत्यू झाला.