डोंगरची काळी मैना भोरच्या बाजारात दाखल
भोर : रखरखत्या उन्हाळी हंगामात येणाऱ्या फळांची मेजवानी काही औरच असते. काही फळे तर डोंगराच्या कड्या कपाऱ्यात बहरलेले असतात. त्यापैकी डोळ्यांचे पारणे फेडणारे व चवीने गोड, आंबट असे गुलाबी व बाहेरुन काळ्याकुट्ट रंगाच्या आकाराने छोटे असणाऱ्या काटेरी जाळीमध्ये विशेषतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पिकणाऱ्या करवंदाची म्हणजे डोंगराच्या या काळ्या मैना भोरच्या बाजारात दाखल झाली आहे. या रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहक गर्दी करू लागले आहेत.
भोर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये जंगल मोठ्या प्रमाणावर असल्याने जंगलात विविध प्रकारची झाडे- झुडपे तसेच औषधी वनस्पती आढळून येतात. सध्या तालुक्याच्या दक्षिण व पश्चिमेकडील डोंगरदऱ्यात आळू, करवंदे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. डोंगराळ भागातील गावात राहणाऱ्या नागरीकांना उन्हाळ्यात उदरनिर्वाहाचे हे एक साधन असल्याने नागरिक करवंदे, आळू विक्रीसाठी बाजारात घेवून येत आहेत. सद्या किलोच्या १० ते १५ पाट्या बाजारात विक्रीसाठी विक्रेते घेऊन येत असल्याचे चित्र आहे.
रोजगारासाठी ग्रामीण भागातील महिला, पुरुष करतात करवंदे तोडण्याचे काम..
एप्रिल व मे महिन्यात येणाऱ्या करवंदामुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळतो. सध्या शेतीची कामे आटोपल्याने महिलांना रोजगार मिळत आहे. पिकलेली करवंद जाळीतून शिरुन तोडणे जिकिरीचे काम असते. या जाळीला अनुकुचीदार आणि मोठे काटे असल्याने हे काम करणे खूप अवघड असले तरी रोजगार मिळत असल्याने महिला व पुरुष वर्ग करवंद तोडण्याचे काम करत आहेत. अशाप्रकारे एक एक करून दिवसभर करवंद तोडने भर उन्हात तापदायक ठरते. त्यामुळे पहाटे लवकर उठून करवंद काढली जातात. त्यानंतर सकाळी बाजारात विक्रीसाठी आणली जातात. या विक्रीतून मिळालेल्या कमाईतूनच वर्षभराचा घर संसार चालवला जातो असे कोंडगाव (ता. भोर) येथील करवंदे विक्रेते लक्ष्मण विठ्ठल हुंबे यांनी सांगितले.
आळू, करवंदाची किरकोळ व होलसेल विक्री..
जसजसा कडक उन्हाळा सुरू होईल तसे डोंगर भागातील करवंदे व आळूची आवक वाढेल असे विक्रेत्यांकडून बोलले जात आहे. किरकोळ विक्री केल्यास आळूची १०० तर करवंदाची १५० रुपये प्रति किलो विक्री सुरू आहे. तर होलसेल विक्रीला आळूला पन्नास तसेच करवंदांना ८० रुपये प्रति किलोला बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे शक्यतो शहरात फिरून हात विक्री करूनच करवंदे व आळू विकले जात असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
करवंदांमधील ‘क’ जीवनसत्व शरीरासाठी ठरते फायदेशीर..
दरवर्षी उन्हाळ्यात करवंदाची फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मधुमेहांसाठी तसेच त्वचा विकारांवर फायदेशीर ठरत असल्याने त्यामध्ये सायट्रीक ॲसिडच्या मुबलक प्रमाणामुळे तसेच उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर करवंदे खाने फायदेशीर असते.