अघोरी प्रकारामुळे दौंड मध्ये खळबळ; दौंड तहसील कार्यालयासमोरच आढळले नारळ, हार आणि अंडी
दौंड : विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी अनेकांच्या डोक्यात असलेले अंधश्रद्धेचे भूत उतरायला तयार नाही. त्यातच दौंड तहसील कचेरीसमोर अघोरी प्रकार पाहायला मिळाला. यामध्ये आठ नारळ, अंडे, गजरे, हार अशा अनेक वस्तू या शासकीय प्रांगणात ठेवलेल्या पाहायला मिळाल्या. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
दौंड तहसील कार्यालयात दिवसभरात हजारो नागरिकांची ये-जा असते. हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घतल्यासारखा आहे. असा प्रकार एका शासकीय प्रांगणात घडल्याने दौंडचे तहसीलदार अरुण शेलार व संबंधित अधिकारी यावर काय कारवाई करतात हे पाहणे गरजेचे आहे.
जादूटोणा, भानामती, करणी यासह अन्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबींवर आळा घालण्यासाठी २०१३ मध्ये कायदा झाला. एकूण १२ कलमांचा हा कायदा आहे. भूत उतरविणे, साप चावल्यानंतर उपचार न करता मंत्रातून विष उतरविणे, आर्थिक प्राप्तीसाठी एक प्रकारची दहशत निर्माण करणे यावर आळा घालण्यासाठी बारा कलमांचा हा कायदा आहे. तरीही असे प्रकार अद्यापही कमी होताना दिसत नाही.