अवैध गुटखा वाहतूक करण्या-या पिकअपसह तब्बल २४ लाखांचा गुटखा जप्त; दहशतवाद विरोधी शाखा व राजगड पोलिसांची कामगिरी
खेड शिवापूर : सासवड-खेडशिवापुर रोडवरून बोलेरो पिकअपमधून अवैध गुटखा व तंबाखू वाहतूक करीत असताना दहशतवाद विरोधी शाखा आणि राजगड पोलिसांनी पिकअपसह २३ लाख ९४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल कासुर्डी खे.बा.(ता. भोर) येथील घाटामध्ये जप्त केला. याप्रकरणी चेतन दत्तात्रय खांडेकर(वय २० वर्ष) आणि प्रविण दत्तात्रय खांडेकर(वय २३ वर्ष, दोघेही सध्या रा. कोथरूड, मुळ रा. निजामपुर, ता. सांगोला) यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजगड पोलीस कृष्णा रामचंद्र कदम यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दहशतवाद विरोधी शाखा, पुणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सासवड-खेडशिवापुर रोडवरून एक महिंद्रा बोलेरो पिकअपमधून काही लोक हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा आणि तंबाखू अवैध्यरित्या घेवून येणार आहेत. दहशतवाद विरोधी शाखा व राजगड पोलिसांनी कासुर्डी खे.बा. गावाजवळील घाटात नाकाबंदी केली. यावेळी आलेल्या पिकअपच्या हौदयात अवैध गुटखा व तंबाखू असल्याचे आढळून आले. त्यानंतर सदर दोन आरोपींना ताब्यात घेऊन पिकअपसह २४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई ही दहशतवाद विरोधी शाखा, पुणे आणि राजगड पोलीस यांनी केली असून या कारवाई मध्ये अर्जुन मोहिते, मोहसीन शेख, ओमकार शिंदे, अजित माने, राहुल गायकवाड, प्रमिला निकम सहभागी होते. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे करीत आहेत.