दिव्यांग व्यक्तींच्या मतदार नोंदणीसाठी भोर येथे ३ डिसेंबरला विशेष शिबिर
भोर प्रतिनिधी : विठ्ठल पवार
भोर : भारत निवडणूक आयोग यांच्याकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ नुसार दि.२७ सप्टेंबर रोजी २०३ भोर विधानसभा मतदार संघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच भोर तालुक्यामध्ये १ जानेवारी २०२४ या दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यास दि.२७ ऑक्टोबर, २०२३ पासून सुरुवात झाली असून, तो येत्या ९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती म्हणजेच नवीन मतदार नोंदणीचे, मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती अथवा वगळणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत.
प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने दिनांक ०३ डिसेंबर रोजी दिव्यांग व्यक्तींच्या विशेष मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन योगीराज मंगल कार्यालय भोर येथे सकाळी ११.०० वा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त दिव्यांग बंधू भगिनींनी सदर शिबिराचा लाभ घेऊन मतदार नोंदणी करावी असे आवाहन राजेंद्र कचरे उपविभागीय अधिकारी भोर व सचिन पाटील तहसीलदार भोर यांनी केलेले आहे. ज्या दिव्यांग मतदारांना सदर शिबीरास येणे शक्य नाही असे, दिव्यांग व्यक्ती मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्ती अथवा वगळणीचे कामासाठी अपले मतदान केंद्रामध्ये जाउन सदर संधीचा लाभ घेउ शकतात.