पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी दोन लाचखोर गजाआड; दोन हजारांची लाच घेताना तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पुणे : एकाच दिवशी दोन मोठ्या कारवाया झाल्यामुळे पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. उरुळी कांचन येथील महावितरणचा कार्यकारी अभियंता २ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला असताना, सोमवारी (दि. ४ मार्च) रोजी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथून अजून एक घटना समोर आली आहे. सात बारावर नोंद घालण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राजगुरुनगरचे तलाठी बबन कारभारी लंघे (वय ४६ वर्ष) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
याप्रकरणी एका ३७ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या मित्राची पत्नी असे दोघांचे भागीदारीमध्ये एक गुंठा क्षेत्र सामाईकमध्ये खरेदी केले आहे. त्या जमिनीच्या क्षेत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी लोकसेवक बबन लंघे यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजगुरुनगर तलाठी कार्यालयात सापळा रचला होता. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून सात-बारा उताऱ्यावर नोंद करुन, उतारा देण्यासाठी तडजोडीअंती २ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. हीच लाच स्वीकारताना तलाठी बबन लंघे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आरोपी लंघे याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रणिता सांगोरकर करत आहेत.