खंडाळा तालुक्यातील केसुर्डी ग्रामस्थांचा उद्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा
खंडाळा : केसुर्डी MIDC मधील इलजिन ग्लोबल इंडिया कंपनी व ओरीयंटल इस्ट कंपनी यांच्याकडून केमिकलयुक्त राख व लिक्वीड यांची अवैधरित्या विल्हेवाट लावली जात असून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर धुराड्यामधून धुर बाहेर फेकला जातो. यामुळे केसुर्डी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये शेती नापिक होणे व पशुधन व मानव जीवन यांच्या आरोग्यास हानी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर कारवाई होणेबाबत ग्रामस्थांनी वारंवार संबंधीत उप-प्रादेशिक कायर्यालय म.प्र.नि.मंडळ समिक्षणाशी तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही.
या कंपन्यांच्या माध्यमातून शासनाच्या निकषांची पायमल्ली केली जात असून संबंधित विभागास वारंवार तक्रारी करून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. आर्थिक सौदेबाजीमध्ये हि प्रकरणे दडपण्यात येत असल्याचे प्रमोद विठ्ठल जाधव(शेतकरी संघटना) यांनी यावेळेस सांगितले.
या कंपन्यांमुळे केसुर्डी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शेती, पाणी नापिक होऊन भविष्यातील पिढ्या उदनिर्वाहाच्या साधनांपासून वंचित राहणार असल्याचेही प्रमोद जाधव यांनी या वेळेस सांगितले. वरील कंपन्यांवर १५ जानेवारी २०२४ पर्यंत योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. परंतु संबंधित कंपन्यांवर अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे अखेर उद्या २४ जानेवारी रोजी केसुर्डी MIDC येथील ओरीयंटल इस्ट कंपनी येथून खंडाळा तहसीलदार व तेथून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत सर्व पिडीत ग्रामस्थ अर्धनग्न मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे प्रमोद जाधव व केसुर्डी ग्रामस्थांनी या वेळेस सांगितले.