खेडशिवापुर येथे विहिरीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह; परिसरात खळबळ
खेडशिवापुर (ता.हवेली, जि.पुणे) येथील विहरीमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.
पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापुर येथील सुनीता मोहन नवघणे (रा.बालाजीनगर,धनकवडी,पुणे) यांच्या गट नं १८६ मधील शेतामध्ये विहीर आहे. शेतालगत असणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना विहिरीतून दुर्गंधी येत असल्याने कर्मचाऱ्यांनी नवघने कुटुंबीयांशी संपर्क साधला. यांनतर नवघने कुटुंबीय खेड शिवापूर येथील असणाऱ्या शेतात सोमवारी (११ डिसेंबर) पोहोचले. तेव्हा त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना पाण्यात पुरुष जातीचा मृतदेह तरंगताना दिसला. सुनिता नवघने यांनी तात्काळ राजगड पोलिसांशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली. राजगड पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या पुरुषाचे जवळपास वय ४० वर्षे असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या पुरुषाची अद्याप ओळख पटलेली नाही.
आजूबाजूच्या परिसरातील ४० वर्षीय पुरुष कोणी बेपत्ता असल्यास राजगड पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे यांनी केले आहे.