जमीन मोजणीच्या प्रकरणात हवेलीतील भू-करमापकासह खासगी व्यक्ती ५० हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
हवेली : जमीन मोजणी व क्षेत्राची हद्द ठरवून देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील भू करमापकाने तब्बल ४ लाखांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तडजोडी अंती भू-करमापकातर्फे ५० हजारांची लाच स्विकारताना खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.
दौलत मधूकर गायकवाड (३५, भू–करमापक, हवेली कार्यालय) याच्यासह खासगी व्यक्ती योगेश्वर राजेंद्र मारणे (२५, रा. एरंडवणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघांनाही एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत ३१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची देहुगाव येथे जमीन आहे. त्या जमिनीच्या मोजणीसाठी व क्षेत्राची हद्द ठरवून घेण्यासाठी आरोपी लोकसेवक दौलत गायकवाड यांनी एका खासगी इसमामार्फात तक्रारदार यांच्याकडे ४ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दिली होती.
त्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली असता खासगी इसम योगेश्वर मारणे याने दौलत गायकवाड यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांची जमीन मोजणीसाठी व क्षेत्राची हद्द ठरवून घेण्यासाठी ५० हजार रुपये तक्रारदार यांचेकडून घेतल्याचे निष्पन झाले. मारणे आणि गायकवाड या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.