भोर तालुक्यातील नेरे आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बंद; अत्यवस्थ रुग्णांची हेळसांड
रुग्णवाहिका सेवा आठ दिवसात पूर्ववत न झाल्यास निस्वार्थ सेवा युथ फाऊंडेशनचा तीव्र आंदोलनाचा इशारा
भोर : भोर तालुक्यातील रोहिडा खोऱ्यातील नेरे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील रुग्णवाहिका गेले पाच महिन्यांपासून बंद असल्याने अत्यवस्थ रुग्णांची गैरसोय होत आहे. ही गंभीर समस्या असून देखील आरोग्य व्यवस्थापन जाणून बुजून याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या दुर्गम भागातील ४५ गावातील सर्वाधिक रुग्ण प्राथमिक उपचार घेण्यासाठी नेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून येथील रुग्णवाहिका बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. विशेषत : दुर्गम भागातून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला, रुग्णांचे हाल होत आहेत. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना गेली पाच महिने नेहमी खाजगी गाडी मागवावी लागते. मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नाही. रुग्णवाहिका बंद असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
गेल्या ५ महिन्यांपासून सदर रूग्णावाहिका बंद असल्याने ग्रामीण भागातील रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर सेवा देण्यात यावी या आशयाचे निवेदन निस्वार्थ सेवा युथ फाऊंडेशनने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जयदिप कापशीकर यांना दिले आहे. तसेच या पत्राबाबत आठ दिवसात कोणतीही कार्यवाही न केल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनचाही इशाराही या वेळेस त्यांनी दिला. याप्रसंगी निस्वार्थ सेवा युथ फाऊंडेशनचे रोहन भोसले, आकाश दानवले, समीर घोडेकर, शिवाजी उल्हाळकर, संजय पवार, विजय तामकर, रोहित देशमाने, साहिल दानवले, संकेत दानवले, कृष्णा दानवले, हनुमंत धामुनशे आदी उपस्थित होते.
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदिप कापशीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच नागरिकांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.