पुणे लोकसभा निवडणूक तत्काळ घ्या! निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणुक तात्काळ घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. खासदार गिरीष बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली होती.
त्यानंतर आता तिथे निवडणुक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. २९ मार्च रोजी खासदार गिरीष बापट यांचे निधन झाले होते. तेव्हापासून त्यांची जागा रिक्त आहे. त्यामुळे सुघोष जोशी यांनी पोटनिवडणुक घेण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने बुधवारी निवडणुक आयोगाला लवकरात लवकर पोटनिवडणुक घेण्याचे आदेश दिले आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आता या जागेसाठी निवडणुक घेतल्यास निवडून आलेल्या खासदाराचा कार्यकाळ केवळ ३ ते ४ महिन्यांचा असेल, असे निवडणुक आयोगाचे म्हणणे होते. परंतू, उच्च न्यायालयाने हे कारण फेटाळून लावत निवडणुक आयोगाला निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.न्यायमूर्ती जीएस पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी पार पडली.